आसुद विषयी

निसर्गाच्या कुशीत वसलेले कोकणातील एक सुंदर गाव. ‘दापोली’ पासून फ़क्त ५ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. गावातील घरे मुख्य ३ वस्त्यांमधे वसलेली आहेत. यापैकी ‘आसुदबाग’ किंवा ‘दाबकेवाडी’ हे प्रमुख. त्यानंतर आसुद जोशी आळी व नंतर आसुद पूल.

आसुदबाग येथे प्रामुख्याने दाबके आडनावाचे चित्पावन ब्राह्मण लोक राहतात. सुमारे ५० वर्षांपुर्वीपर्यंत गवामधे १५-२० घरे होती व सध्या ती कमी होत ८-१० घरांवर आली आहेत. याशिवाय येथे ‘रिसबूड’ यांची ४-५ घरे आहेत. गावाचा इतिहास साधारणपणे २००-२५० वर्षे जुना आहे. आसुदबाग येथे येण्यापुर्वी दाबके हे ‘बोर्डी’ गावात राहत होते असे म्हणतात. परंतु आता तेथे कोणीही नाही. २५० वर्षांपुर्वी ‘विश्वनाथ’ नावाचा दाबके आसुदबाग येथे आला व त्यापुढील वंशावळ ज्ञात आहे. गावातील लोकांचे प्रमुख उपजिवीकेचे साधन म्हणजे सुपारीच्या बागा आणि भातशेती. गावातील जमिनी या संपुर्णपणे डोंगराच्या उतारावरील असल्याने कोठेही सलग १-२ एकरापेक्षा सपाट जागा नाही. सुपारीची झाडे लावुन त्यापासुन उत्पन्न मिळावयास ७-८ वर्षे लागतात. अशी हजारो झाडे येथील पूर्वजांनी लावून अतिशय मेहनतीने हे गाव तयार झाले आहे.

भातशेती साधारणपणे फ़क्त वैयक्तिक वापरासाठी होते. याशिवाय काही वेळा नाचणी (नागली), पावटे (वाल) यांचे उत्पन्न होते. आंबा, फणस व कोकम यांच्या आंशिक लागवडीमुळे काही प्रमाणात उत्पन्न मिळते. सुपारीच्या झाडांना १२ महीने पाणी द्यावयास लागते, यासाठी आसुदबागेपासुन २ कि. मी. अंतरावर डोंगरामधुन वाहणारया् छोट्या नदीला बंधारा घालून ते पाणी सुपारीच्या बागांसाठी व पिण्यासाठी दगडी व मातीचा बांध बांधून सर्व ठिकाणी फिरवण्यात आले आहे. या पाण्यावर शुद्धतेसाठी कोणतीही प्रक्रिया होत नाही. गेल्या २०-२५ वर्षातील वाढत्या प्रदुषणामुळे पाण्याची अशुद्धता वाढत चाललेली आहे.

साधारणपणे इ.स. १८७५ नंतर जेव्हा मुंबई व इतर ठिकाणी कापडगिरण्या सुरु झाल्या तेव्हापासुन आसुद येथील मंडळी आसुद सोडून इतर ठिकाणी रहावयास स्थलांतर करू लागली. शिरस्त्याप्रमाणे काही वर्षे कुटुंब आसुद येथे ठेवून फक्त पुरुष माणसे मुंबईस जाऊन येत असत परंतु १९०० सालानंतर कुटुंबासकट स्थलांतर होऊ लागले.

आज मुंबई पुण्याच्या बाहेर जगामधे इतरत्र सुद्धा रहाणारे पण मुळ आसुदचे असणारे दाबके आहेत. या सर्वांनी आपल्या गावाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

राहणीमान

आसुदबाग येथील भौगोलिक रचनेमुळे व सुपारीच्या उंच झाडांमध्ये असलेल्या घरांमुळे इथे वीज १९९० सालामध्ये आली. तोपर्यंत व अजुनसुद्धा सर्व व्यवहार कंदिलाच्या प्रकाशात करावे लागत. सुपारीच्या बागांना पाणी वेळ ही जमिनीच्या क्षेत्रफळानुसार वाटुन घेण्यात आलेली आहे. किरकोळ वाद वगळता ही पद्धत अतिशय व्यवस्थितपणे गेली २५० वर्षे चालू आहे.

Comments are closed.